Ashes Series 2025 : क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) सुरू असलेली ‘बॉक्सिंग डे’ कसोटी पहिल्याच दिवशी इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. अवघ्या 7 तासांच्या खेळात दोन्ही संघांचे पूर्ण डाव गडगडले असून एकाच दिवसात 20 फलंदाज बाद होण्याची 1951 नंतरची ही पहिलीच वेळ आहे. तीव्र सीम मूव्हमेंटसमोर दिग्गज फलंदाजांनी नांग्या टाकल्याने ही कसोटी आता दोन दिवसांतच संपण्याची चिन्हे आहेत. या सामन्याने उपस्थितीचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. मैदानात तब्बल 94,199 प्रेक्षक उपस्थित होते, ज्यांनी 2015 च्या विश्वचषक फायनलचा (93,013) विक्रम मोडीत काढला. मात्र, या विक्रमी गर्दीसमोर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. संपूर्ण दिवसात एकाही खेळाडूला 41 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
ऑस्ट्रेलियाचा डाव १५२ धावांत कोसळला
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो जोश टंगने सार्थ ठरवला. जोश टंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 5-45 अशा धावा देऊन ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. स्टँड-इन कर्णधार स्टीव्ह स्मिथ (9), लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांसारखे दिग्गज स्वस्तात परतले. मायकेल नेसरच्या 35 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 152 धावांपर्यंत मजल मारली.
इंग्लंडची स्थिती अधिकच बिकट
प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात भयानक झाली. अवघ्या 4 धावांत त्यांचे 4 प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. हॅरी ब्रूकने 41 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण स्कॉट बोलँडने त्याला बाद करून इंग्लंडच्या आशा संपुष्टात आणल्या. फलंदाजीत योगदान दिल्यानंतर मायकेल नेसरने गोलंदाजीतही 4-45 अशी भेदक कामगिरी केली. इंग्लंडचा संपूर्ण डाव 110 धावांत आटोपला.
दिवसअखेरची स्थिती
पहिल्या डावात 42 धावांची आघाडी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद 4 धावा केल्या असून त्यांची एकूण आघाडी 46 धावांची झाली आहे.


