अष्टपैलू
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी करण्यात आली. निवड समितीने अपेक्षेप्रमाणे संघात काहीच बदल केले नाहीत. प्रयोग करण्यासाठी फारसा वेळ नसल्यामुळे फार मोठा धाडसी निर्णय निवड समितीने घेतला नाही. मात्र, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट कर्णधार असलेल्या शुभमन गिलला वगळण्याचे धाडस मात्र त्यांनी दाखवले आहे. त्याचवेळी यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा यालाही वगळण्यात आले आहे. या दोघांच्या जागी रिंकु सिंग आणि ईशान किशन यांना संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ नेमका कसा आहे?
भारतीय निवड समितीने टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना फारसा चकित करणारा निर्णय घेतलेला नाही. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शुभम दुबे, रिंकू सिंग, इशान किशन, अक्षर पटेल, जसप्रित बुमरा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील असा संघ निवड समितीने निवडला आहे. घरच्या मैदानावर सामने असल्यामुळे सहाजिकच फिरकी गोलंदाजांना निवड समितीने झुकते माप दिले आहे.
शुभमनला वगळण्यामागचे नेमके कारण काय?
टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार आणि टी २० संघाचा उपकर्णधार शुभमन गिल याला वगळण्यात आले आहे. गिलची संघात वर्णी न लागण्याचे त्याचा हरवलेला फॉर्म हे एकच कारण निश्चित नाही. कारण संघ निवडीसाठी फॉर्म हा एकच निकष लावला गेला असता, तर थेट सुर्यकुमार यादवच्या स्थानालाही धक्का बसत होता. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सुर्यकुमार यादवला आपला लौकिक राखता आलेला नव्हता. त्यामुळे गिलला वगळण्यामागे खराब फॉर्मबरोबर त्याची तंदुरुस्ती हे एक कारण असू शकतो. याच मालिकेत सुरुवातीला मानेच्या दुखापतीमुळे गिल कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळू शकला नव्हता. टी २० सामन्याच्या मालिकेसाठी तंदुरुस्त झाला, तर तिसऱ्याच सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. यामुळे तो अखेरच्या दोन सामन्यातही संघाबाहेर होता. टी २० विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवस शिल्लक असल्यामुळे आणि त्यापूर्वी हाच संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार असल्यामुळे निवड समितीने भविष्यातील क्रिकेटचा व्यग्र कार्यक्रम पाहून गिलचा विचार केला नसावा.
जितेश शर्मावर अन्याय?
यष्टिरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्माने नक्कीच चांगली कामगिरी केली होती. जितेशच्या कामगिरीमुळे संजू सॅमसनचे स्थान धोक्यात आले होते. दोघेही यष्टिरक्षक असल्यामुळे त्यांच्यात तुलना व्हायला लागली आणि यष्टिरक्षक फलंदाज म्हणून जितेशला संधी मिळू लागली. मात्र, अलिकडे फारसे सामने झालेले नसताना पुरेशी संधी न देताच जितेशला वगळून निवड समितीने त्याच्यावर अन्याय केला आहे. गिलच्या जागी संजू सॅमसन निश्चित होता हे पक्के झाल्यावर यष्टिरक्षक म्हणून जितेशला संधी मिळणे अपेक्षित होते. शिवाय त्याच्यामुळे तळातील फलंदाजीला बळकटी मिळते.
ईशान किशनची निवड किती योग्य?
ईशान किशन हा तसा भारतीय संघाबरोबर राहिलेला खेळाडू आहे. त्याला भारतीय संघ नवा नाही. यापूर्वी देखिल त्याने भारताकडून खेळताना आपली छाप पाडली आहे. पण, खेळातील आक्रमकता त्याच्या स्वभावातही असल्यामुळे त्याला त्याचा फटका बसला होता. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केल्यानंतरही त्याने कारणे देत स्थानिक क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. यामुळे बीसीसीआयला मध्यंतरी तो नकोसा झाला होता. मात्र, उपरती यावी तसा इशान काहीच संधी मिळत नसल्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला. सय्यद मुश्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेत त्याने स्वतःला सिद्ध केले. अंतिम सामन्यात त्याने शतकी खेळी करत झारखंड संघाला एकाहाती विजेतेपद मिळवून दिले होते. याच खेळीची त्याला पावती मिळाली असली, तरी ती संधी साधण्याचे आता त्याच्या हातात आहे.
संघाचे वैशिष्ट्य काय म्हणता येईल?
या स्पर्धेसाठी निवडलेला संघ हा भारताच्या भविष्याकडे बघून निवडण्यात आला असे म्हटले तर चूक ठरणार नाही. अनुभवाला प्राधान्य देताना त्यांनी युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. तिलक वर्मा, रिंकू सिंग, इशान किशन, अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंची निवड बघितली की संघातील तरुणाईच्या आक्रमकतेला संधी दिल्याचे दिसून येते. अक्षर पटेलची निवड ही एक बहुपयोगी खेळाडू म्हणून करण्यात आली आहे. उपकर्णधार म्हणून संधी देताना त्याला जबाबदारी देखिल दिली आहे. संजू सॅमसनला आतापर्यंत मधल्या फळीत खेळावे लागत होते. या वेळी तो आपल्या आवडत्या सलामीला येऊ शकेल. यष्टिरक्षक म्हणून त्याच्यावर वाढती जबाबदारी असली, तरी संघात इशान किशनच्या रुपाने दुसरा यष्टिरक्षक निवडण्यात आला आहे.
संघाची ताकद काय असेल?
अन्य देशांपेक्षा अधिक क्रिकेट तर भारतात खेळले जाते हे वेगळे सांगायची गरज नाही. आयपीएलमुळे तर टी २० क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. भारतीय क्रिकेटपटूंना या क्रिकेटपद्धतीची जणू सवय झाली आहे. २०२४ मध्ये विजेतेपद मिळविणारा आणि या वेळी विजेतेपद टिकविण्यासाठी निवडलेला संघ यात काही फरक नाही. फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू असा ठासून दारुगोळा भरलेली तोफ म्हणूनच या संघाकडे बघता येईल. अन्य संघाची तयारी किंवा त्यांची टी २० क्रिकेट खेळण्याची देहबोली पाहिली, तर भारतीय संघ केव्हाही उजवा ठरतो. कुठल्याही संघाला हा भारतीय संघ सरस ठरेल इतकी ताकद या संघात आहे. कर्णधार सुर्यकुमारचे आक्रमक नेतृत्व हा या तगड्या संघाची खरी ओळख करुन देता येईल. बुमरा, अर्शदीप सारखे वेगवान आणि समोरच्या फलंदाजांना ज्यांच्या चेंडूचा कधीच थांगपत्ता लागत नाही, असे कुलदीप आणि वरुण ही फिरकी गोलंदाजांची जोडी.


