अष्टपैलू
भारतीय युवा संघाने जिंकलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या चोविस तासांनी भारतात वरिष्ठ गटाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेला तशी अपेक्षित सुरुवात झाली.
पण, टी २० क्रिकेटमध्ये असलेला धोका पहिल्याच दिवसातील दोन सामन्यांतून मिळाला. नेदरलॅण्ड्स संघाने पाकिस्तानच्या नाकात दम आणला, तर अमेरिकेने भारतीय फलंदाजीतील उणिवा समोर आणल्या.
वेस्ट इंडिजने मात्र पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी दाखवून आपणही कधी दोनवेळा विश्वविजेते होतो याची आठवण करुन दिली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅण्ड्स संघा दरम्यान झालेल्या सामन्याने सुरुवात झाली.
पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर नेदरलॅण्ड्स संघाच्या फलंदाजीची तशी हवा राहिली नाही. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनी पाकिस्तान संघावर एकवेळ दडपण आणून आपली हवा निश्चित निर्माण केली. शाहीन शाह अफ्रिदी, सलमान मिर्झा हे वेगवान गोलंदाज उठून दिसले.
पण, मोहम्मद नवाझ, अब्रार अहमद, सईम अयुब या फिरकी गोलंदाजांनी भाव खाल्ला. या पाकिस्तानच्या पंचसूत्री गोलंदाजांना स्पर्धेत असेच सातत्य दाखवावे लागणार आहे. स्पर्धा उपखंडात असल्यामुळे खेळपट्ट्या अशाच मंद मिळणार आहेत.
फलंदाजीला साथ मिळेल. पण, डावातील मधली षटके ही निर्णायक ठरणार याची झलक या सामन्यात बघायला मिळाली. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला वेगवान सुरुवात मिळाल्यानंतरही एकवेळ त्यांचा डाव २ बाद ९८ वरुन ७ बाद ११४ असा अडचणीत आला होता.
ही सगळी पडझड मधल्या षटकांतच झाली. अवघ्या १६ धावांत पाकिस्तानने पाच फलंदाज गमावले. त्यानंतर १२ चेंडूत २९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दोन्ही संघाचे चाहते क्रॉस बोटं करुन बसली असतील यात शंका नाही.
फहिम अश्रफने यातून मार्ग काढला आणि ११ चेंडूंत २९ धावांची नाबाद खेळी करुन पाकिस्तानला विजयाचा दिलासा दिला. तेव्हा १९व्या षटकांत दुसऱ्या चेंडूवर मॅक्स ओडाउडला फहीमच्या सोडलेल्या झेलाची खंत नक्की वाटली असेल.
दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला स्कॉटलंडकडून तसे आव्हान मिळाले नाही. विंडीजसाठी या वेळी शिमरन हेटमायर आणि रोमारियो शेफर्ड धावून आले. हेटमायर मर्यादित षटकांच्या सामन्यातील तसा गुणी खेळाडू. मोठी खेळी करण्याची त्याच्याकडे अफाट क्षमता आहे.
पण, आतापर्यंत अभावानेच तो आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला होता. या वेळी मात्र, त्याने मनापासून फलंगाजी केली आणि त्याच्या फलंदाजीने विंडिजचे आव्हान भक्कम झाले. त्यानंतर स्कॉटलंडने आव्हानाचा पाठलाग करताना धडपड दाखवली.
पाकिस्तानच्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १७ षटकांत ५ बाद १३३ अशा टी २० क्रिकेटमध्ये सुस्थिती म्हणता येईल अशा स्थितीत होता. त्याचक्षणी शेफर्डने कमाल केली आणि स्कॉटलंडचे अखेरचे पाच फलंदाज ११ चेंडूंत १४ धावांत गारद झाले आणि स्कॉटलंडचा डाव १४७ धावांत आटोपला. सतराव्या षटकांत शेफर्डने हॅटट्रिकसह चार गडी बाद केले.
तिसरा सामना भारताचा होता. गेल्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवणाऱ्या अमेरिका संघाशी यजमानांची सलामी झडली. हा सामना म्हणजे भारतविरुद्ध अर्धा आशिया खंड असाच वाटत होता. अमेरिका संघात चार भारतीय आणि दोन पाकिस्तानी खेळाडूंचा होता.
पाकिस्तानचे खेळाडू हे वंशाने पाकिस्तानी होते. भारतीय खेळाडू मात्र पूर्वी भारताची क्रिकेट पंढरी असलेल्या मुंबईतील होते. सामना देखिल मुंबईत होता. गेल्या स्पर्धेची आठवण व्हावी अशीच अमेरिकेची सुरुवात होती.
दुसऱ्या डावात पडणाऱ्या दवाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर सध्या सर्वाधिक धोकादायक असलेल्या अभिषेक शर्माला त्यांनी बाद केले.
त्यानंतर एक, दोन असे करत असे त्यानी भारताचे सहा फलंदाज ७७ धावांत तंबूत पाठवले होते. शंकेची नाही नाही धोक्याची घंटा वाजावी अशी ही स्थिती होती. भारताला दिलासा होता तो सुर्यकुमार खेळपट्टीवर असल्याचा.
कर्णधार या नात्याने त्याने पडझड पाहून सुरुवातीला दाखवलेला संयम आणि अखेरच्या षटकांत परजलेली बॅट सर्वात निर्णायक ठरली. अखेरच्या षटकांत सौरभ नेत्रवालकर या आपल्या एकेकाळच्या मुंबईच्या सहकाऱ्याच्या गोलंदाजांवर चढवलेला हल्ला निर्णायक ठरला.
याला टी २० क्रिकेटमधील अनिश्चितता मानले जाईल. प्रत्यक्षात ही अनिश्चितता नाही, तर ही क्रीडा मानसिकता आहे. परिस्थितीनुसार कसे खेळायचे ही अनिश्चितता नसती, ते नियोजन असते. सुर्याने ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची विजयी खेळी केली.
त्यानंतर गोलंदाजांनी त्यांचे काम चोख बजावले. बुमरा सर्वात धोकादायक गोलंदाज आहे यात शंका नाही. पण, सध्या तो नसला, तरी दुसऱी फळी मजबूत आहे हे अनेक सामन्यातून दिसून आले, ते आजही समोर आले.
सिराज, अर्शदीपने सुरुवातीला धक्का दिल्यावर मधल्या षटकांत वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी अमेरिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले. भारताने सामना जिंकला, असला तरी फलंदाजीतील उणिवा समोर आल्या. आज टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ अजिंक्य आहे.
त्यांना हरवणे सर्वात कठिण आहे. समोरच्या संघाला आपल्या क्षमतेच्या पलिकडे जाऊन खेळ करावा लागणार इतकी दहशत या संघात आहे. खोलवर असलेली फलंदाजी आणि मधली षटके टाकणारे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज यामुळे भारताला खरंच टी २० मध्ये हरवणे हे मोठ्या दिव्यातून जाण्यासारखेच आहे.
तरी देखिल ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग या गुणी फलंदाजांना आक्रमकतेत कुठे थांबायचे हे शिकायला हवे. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकारापेक्षा धाव हे सूत्र त्यांनी समजायला हवे. सुर्याने ते त्यांना दाखवून दिले आहे.
असो, विजेतेपदासाठी झगडण्याची जगातील सर्वोत्तम संघांची मोहिम एकदाची सुरु झाली. कारण, क्रिकेट, क्रिकेटपटू आणि प्रशासक यांना प्रसिद्धिच्या झोतात कसे रहायचे हे चांगले समजते.
त्यामुळे बांगलादेशच्या हकालपट्टीपासून सुरु झालेले नाट्य पाकिस्तानच्या भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयापर्यंत अजून टिकून आहे. भारताविरुद्ध न खेळणे हे पाकिस्तानला मैदानावर आणि बाहेरही परवडणारे नाही. हे त्यांना माहित नाही असे नाही.
पण, चर्चेत कसे राहायचे हे क्रिकेटमधून शिकावे. भारताविरुद्धच्या सामन्याला अजून आठवडा आहे. सामना पुन्हा एखदा रविवारी आहे. त्यापूर्वी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे चित्र समोर येईल.
कारण, अद्याप त्यांनी आयसीसीशी थेट संवाद साधलेला नाही. आता तर आयसीसीने त्यांना भारताविरुद्ध न खेळण्यासाठी करारातील अपरिहार्य स्थिती (फोर्स मॅज्युअर ) कशी याचा खुलासा मागितला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान मंडळआणि आयसीसी यांच्या दरम्यान चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेला येत्या काही दिवसात पूर्णविराम मिळेल आणि भारत विरुद्ध पाकिस्तान हा सर्वांचे उखळ पांढरे करणारा सामना होईल अशी आशा करुयात.


