मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सेहवाग हा त्याच्या काळात सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जायचा. त्याने अनेक गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. मात्र, आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे. सेहवागच्या २१ वर्षांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्याचा बातम्या सर्वत्र येऊ लागल्या आहेत.
सध्या भारतीय क्रिकेट जगतात अनेक क्रिकेटपटूंच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. गेल्याच वर्षी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाला आहे. त्याचबरोबर सध्या लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही जोरात आहेत. आता अशा परिस्थितीत माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्याबद्दल ते वेगळे होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. सेहवाग आणि आरतीच्या लग्नाला २१ वर्षे झाली असून त्यांना दोन मुले देखील आहेत.
सेहवागने नेहमी त्याचे कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवले आहे. तो कधी कधी सणासुदीला कुटुंबासोबतचे फोटो शेअर करतो. गेल्या दिवाळीला सेहवागने त्याची आई आणि मोठा मुलगा आर्यवीरसोबत एक फोटो शेअर केला होता. पण, त्याची पत्नी आणि दुसरा मुलगा वेदांत कुठेच दिसत नसल्याने त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. सेहवागने आपल्या पत्नीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यानंतर दोघेही वेगळे होणार या चर्चेला ऊत आला.


