दुबई: बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहू देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता आयसीसीने भारताच्या जर्सीवरचे पाकिस्तानचे नाव काढून टाकण्याचा विचार करत असल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांचे खंडन केले आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर स्पर्धेचा अधिकृत लोगो असणे अनिवार्य आहे, ज्यामध्ये यजमान देशाचे नाव देखील समाविष्ट आहे. टुर्नामेंटचा लोगो आपल्या जर्सीवर लावणे ही प्रत्येक संघाची जबाबदारी आहे. सर्व संघांनी हा नियम पाळणे बंधनकारक आहे, असे म्हटले आहे.
आयसीसीने असेही स्पष्ट केले की, जे संघ लोगो योग्यरीत्या जर्सीवर वापरणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हे वृत्त निराधार असल्याचे नाकारले आणि बोर्डाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने कोणत्याही भारतीय मीडिया आउटलेटशी या विषयावर चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले. पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान आयसीसीचे हे वक्तव्य आले आहे.
दरम्यान एका अहवालात असे म्हटले होते की, बीसीसीआयने संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिलेले नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय बोर्डाकडून अशी कोणतीही माहिती मिळाल्याचे नाकारले आहे. विशेषतः भारतीय बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून खूपच तणावपूर्ण आहे.


