अहिल्यानगर : जुन्नरनंतर आता आहिल्यानगरमध्ये बिबट्याने हाहाकार माजवला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात केवळ ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर–मनमाड महामार्गावर मृतदेहासह रास्ता रोको करत वनविभागाच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
स्थानिक नागरिकांनी वनअधिकाऱ्यांना फैलावर घेत, “बिबट्यांचा बंदोबस्त नेमका कधी होणार?” असा सवाल केला आहे. दुसरीकडे, वनविभागाने हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी टाकळी शिवारात पिंजरे लावून शोधमोहीम सुरू केली आहे. विभागाचा मोठा फौजफाटा त्या भागात दाखल झाला आहे.
या घटनेनंतर वनविभागाने जनजागृतीसाठी विशेष व्हिडिओ जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांच्या स्थलांतरासाठी सव्वा अकरा कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. तरीदेखील, बिबट्यांची दहशत पुणे, नगर आणि आसपासच्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याने भीती वाढली आहे.


