बिहार निवडणुकीत जन सुराजला एकही जागा मिळालेली नाही. प्रशांत किशोर जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार समजले जातात त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच क्षणी तगडा झटका बसला आहे. निवडणुकांपूर्वी तीन वर्ष घेतलेले कष्ट, हजारो किलोमीटरची पदयात्रा, बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय उभा करण्याचा दावा या सर्वांनंतरही त्यांची मोठी निराशा झाली.
240 जागांवर उमेदवार उभे करून त्यांनी बिहारच्या राजकीय नकाशावर एक भव्य आकृती काढण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवाचा अभाव, स्थानिक पातळीवर संघटनात्मक मुळांची कमकुवतता, आणि जातीच्या समीकरणांवर भक्कम पकड नसणे या सर्वांनी एकत्र येऊन जन सुराजचा वेग निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ‘मंद’ केला. पाटण्यातील राजकीय वर्तुळाने हा अंदाज आधीच व्यक्त केला होता आणि निकालांनी त्याचीच पुष्टी केली. प्रशांत किशोर यांना यावेळी जिंकता आले नाही. इतकेच नाही, ते स्पर्धेतसुद्धा नाहीत हे स्पष्ट झाले. रणनीतीचा बादशाह असलेला PK, स्वतःच्या मैदानात मात्र शून्यावर मोजला गेला.
नितीशकुमार यांना 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास राजकारण सोडतो, असे आव्हान दिलेल्या प्रशांत किशोर आता काय करणार? असा सवाल सगळीकडेच उपस्थित होत आहे. निकालामध्ये त्यांच्या पक्षाची निराशा झाली असली, तरी त्यांच्या पक्षाने केलेलं नुकसान एनडीएच्या पथ्यावर पडलेलं दिसून येत आहे. महाआघाडीला मोठा झटका या निवडणुकीच्या निमित्ताने बसला आहे.
प्रशांत किशोर हे कोनार गावात जन्मले. बक्सरमध्ये शिक्षण घेऊन अचानकच UN च्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात झेपावले. 2011 पर्यंतचे त्यांचे आरोग्य क्षेत्रातील नियोजन, सर्वेक्षण, सामुदायिक सहभागाचे कौशल् याचाच परिणाम नंतर त्यांच्या राजकीय रणनीतीत दिसून आला. म्हणजेच, 2012 च्या गुजरात निवडणुकीत भाजपला दिलेला पाठिंबा ही सुरुवात होती.
2013 मध्ये ‘CAG’ या संस्थेची स्थापना करून 2014 च्या मोदी मोहिमेची रणनीती आखली. ती इतकी अचूक, इतकी धक्कादायक की भारतीय निवडणूक प्रचाराचा चेहराच बदलून गेला. ‘चाय पे चर्चा’, 3D रॅली, रन फॉर युनिटी, मंथन, डेटा-आधारित मायक्रो-टार्गेटिंग हे सर्व प्रयोग त्यांच्या नावावर गेले. त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, स्टालिन, जगन रेड्डी, अमरिंदर सिंग, केजरीवालय. अर्थात देशातील जवळपास सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी ते विजयी रणनीतीचे शिल्पकार ठरले.


