Santosh Bangar News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून अनेक जिल्ह्यांत सकाळपासून मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातही मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मात्र मतदान प्रक्रियेच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप उभा राहिला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मतदान कक्षात काय घडले?
हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार भागातील मतदान केंद्र क्रमांक 3 येथे सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मतदान करताना त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएमसमोर थेट मार्गदर्शन केल्याचे दृश्य व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी मतदान केंद्रात “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो” अशा घोषणांचा आवाजही ऐकू येतो. याशिवाय बांगर यांनी मतदान केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचाही आरोप आहे. मतदान केंद्रात घोषणाबाजी, फोनचा वापर आणि मतदाराला थेट मार्गदर्शन करणे या सर्व क्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांचे सरळ उल्लंघन मानल्या जातात. त्यामुळे या प्रकारावर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा –Devendra Fadnavis : उद्याची मतमोजणी रद्द, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल
व्हायरल फुटेज समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीला सुरुवात केली आहे. प्राथमिक अहवालातून गोपनीयतेचा भंग झाल्याची पुष्टी झाल्यास आमदार बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ईव्हीएम बिघाडामुळे मतदान ठप्प
दरम्यान, कळमनुरी नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेतही अडथळा निर्माण झाला आहे. उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक 8 येथे ईव्हीएम मशीनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे मतदान काही काळ पूर्णतः बंद ठेवावे लागले. अचानक थांबलेल्या मतदानामुळे मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असून मतदान लवकरच सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


