मुंबई : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात गारठा वाढत आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान आणि हुडहुडी असण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेमुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राज्यभर वातावरण थंडगार होत आहे, तर काही भागांत पहाटे धुक्याचे प्रमाणही वाढले आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर कायम असून, काल (२ डिसेंबर) धुळे येथे नीचांकी तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच निफाड (८.९ अंश), परभणी (९.८ अंश), जेऊर, अहिल्यानगर आणि भंडारा (१० अंश खाली) येथे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याची झळ बसली.
आज (३ डिसेंबर) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित भागांतही गारठा कायम राहणार आहे, तर कोकणात तापमान थोडे उंचावले असले तरी (रत्नागिरी ३३ अंश), राज्याच्या इतर भागांत पारा सामान्यपेक्षा खाली राहण्याचा अंदाज आहे.
हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांच्या मते, पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रात तापमान आणखी ३ अंशांनी घसरू शकते, ज्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढेल. ३ ते ६ डिसेंबर दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दिवसा ढगाळ वातावरण राहू शकते, पण पावसाची शक्यता फारच कमी आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत (२७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर) किमान तापमान सामान्यपेक्षा खाली राहील, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) विस्तारित अंदाजात नमूद केले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील ‘डिटवाह’ चक्रीवादळाचे अवशेष उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याजवळ सक्रिय असले तरी याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यात थंडीची लाटच प्रमुख असून, नागरिकांनी विशेषतः सकाळ-संध्याकाळी गरम कपडे घालावेत आणि आरोग्याचा विचार करावा, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


