Manikrao Kokate Arrest Warrant: महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवताना कोकाटे बंधूंचे अटकेचे वॉरंट जारी केले आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांचं अटक वॉरंट निघाल्यानंतर आता अटकेच्या कारवाईला वेग येणार आहे. शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी कोकाटे यांना दोन वर्ष आणि दहा हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवताना कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश दिले आहेत.
कोण आहेत माणिकराव?
माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत. सध्या क्रीडा मंत्री आहेत. हे प्रकरण जुने असले तरी शिक्षा कायम झाल्याने त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे. उच्च न्यायालयात अपील केले जाईल आणि तिथे शिक्षेवर स्थगिती मिळाली तर पद टिकू शकते. अन्यथा अटक आणि पद गमावण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सरकारला आणि पक्षाला अडचणीचे ठरू शकते.
काय आहे नेमकं प्रकरण?
महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. याआधी 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने हीच शिक्षा सुनावली होती, जी आता अपीलात टिकली आहे. या निर्णयामुळे मंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे, कारण दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या प्रकरणात सदस्यत्व आपोआप रद्द होऊ शकते.
अटक वॉरंट जारी
महाराष्ट्राचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. नाशिक कोर्टने हा निर्णय दिलाय. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी वॉरंट इश्यू प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. नाशिक प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुपाली नरवडीया यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. त्यांनीच सर्वप्रथम दोन वर्षाची आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.
माणिकराव कोकाटे हे सरकारी इस्पितळात दाखल असल्याचा कोकाटे यांच्या वकिलाचा दावा आहे. अंजली दिघोळे राठोड यांनी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी चार सदनिका लाटल्याचं प्रकरण कोकाटेंच्या अंगलट येताना दिसतय.माणिकराव कोकाटे सोबत संपर्क सुरू आहे. कोर्टात पुढे काय होते त्यानंतर कोकाटे यांच्या बाबत ठरवू अशी अजित पवार यांची भूमिका असल्याचे म्हटलं जातंय. मुंबंई महापालिका निवडणुकीत महायुती जायचे की नाही याचा निर्णय आज घेतला जाईल यासंदर्भात आज पदाधिकारी नेते सोबत चर्चा करणार आहेत.
ते कॅबनिटे मंत्री आहेत त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा असे कोकाटेंच्या वकिलाने सांगितले. यावर न्यायालयासमोर सर्व समान असल्याचे न्यायालयाने म्हटलंय.
कोकाटेंची आमदारकी जाणार?
माणिकराव कोकाटेंची आमदारकी धोक्यात आली आहे. नव्या नियमानुसार कोर्टाच्या आदेशात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर संविधानिक पद धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कोर्टाने अटक वॉरंट काढल्यानंतर आता कोकाटेंची आमदारकी धोक्यात आली आहे. मंत्री माणिकराव कोकाटेंचे पद तांत्रिक दृष्ट्या अद्याप शाबुत असल्याचे म्हटले जात आहे. कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेची प्रत विधिमंडळाला प्राप्त झाली नाही. प्रत मिळाल्यानंतरच आमदारकी रद्द करण्याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांनी दिली.
कोकाटे यांच्यावर नेमके कोणते आरोप?
1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातील 10 टक्के राखीव सदनिकांचे वाटप कमी दरात करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोकाटे बंधू (माणिकराव आणि त्यांचे भाऊ विजय किंवा सुनील) यांनी अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे आणि शहरात घर नसल्याचे खोटे दाखवले. नाशिकच्या उच्चभ्रू भागात दोन सदनिका मिळवल्या. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून 1997 मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एकूण चार आरोपी होते, त्यात कोकाटे बंधू आणि इतर दोघांचा समावेश.
न्यायालयीन प्रक्रिया
हे प्रकरण जवळपास 28-30 वर्षे चालले. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षे तुरुंगवास आणि 50 हजार दंड ठोठावला होता. त्याविरोधात अपील केले असता, जिल्हा सत्र न्यायालयाने (न्यायाधीश पी. एम. बदर) शिक्षा कायम ठेवली, मात्र दंडाची रक्कम 10 हजार रुपये केली. शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांत जामीन मिळाला होता, पण आता अपीलात शिक्षा टिकल्याने अटकेची शक्यता आहे. कोकाटे उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले जाते.
विरोधकांच्या मागण्या
शिक्षा कायम झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आणि आमदारकी रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. नैतिकतेनुसार राजीनामा द्यावा, असा दबाव आहे. याआधीही कोकाटे वादात होते – कृषी मंत्री असताना शेतकरी विधानामुळे आणि विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खाते बदलले गेले. आता हे प्रकरण त्यांच्यासाठी मोठा धक्का मानले जाते.


