Today Winter Temprature : महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीचा कडाका कमी झाला असला तरी वातावरणात गारठा अद्याप कायम आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत असली तरी काही भागांत पहाटे धुके आणि दुपारी तीव्र ऊन जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील किमान तापमानात किंचित चढ-उतार होईल, मात्र थंडीची तीव्रता कमी न होता कायम राहण्याची शक्यता आहे.
थंडीच्या लाटेचे निकषानुसार, किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास किंवा सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट आणि ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र थंडीची लाट घोषित केली जाते. गुरुवारी गोंदिया येथे ८.४ अंश, अहमदनगरमध्ये ८.६ अंश आणि नांदेडमध्ये ८.९ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी तापमानाची नोंद झाली. याशिवाय मराठवाड्यातील अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट दिसून आली आहे.
मालेगाव, नाशिक, मोहोळ, जळगाव आणि यवतमाळ या ठिकाणीही तापमान १० अंशांच्या खाली घसरले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाऊन थंडीचा गारठा अधिक जाणवला. यामुळे रस्त्यांवर शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मागील आठवड्यात थंडी अचानक वाढली होती, नंतर काहीशी कमी झाली; मात्र आज पुन्हा तीव्र झाली आहे.
हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवस राज्यात अशीच थंडी राहणार आहे. तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे नागरिकांना सर्दी, खोकला यांसारखे आजार जडण्याचा धोका वाढला आहे. बदलत्या हवामानात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


