Mahesh Manjrekar: मुंबईच्या विदारक स्थितीवर बोट ठेवत सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपली तीव्र अस्वस्थता व्यक्त केली आहे. जर एखादा चांगला पर्याय उपलब्ध झाला, तर मी तत्काळ मुंबई सोडून जाईन, अशा शब्दांत त्यांनी या महानगरातील ढासळत्या जीवनमानावर प्रहार केला. मुंबईतील हवेची गुणवत्ता आणि अनियंत्रित गर्दीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाल्याचे सांगताना मांजरेकर म्हणाले की, आज शहराबाहेर पडताना एक मुंबईकर म्हणून आपल्याला लाज वाटते. श्वासावाटे आपण ऑक्सिजनऐवजी विषारी वायू ओढत असून एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 183 वर पोहोचल्याने शारीरिक व्याधी वाढत आहेत. एखाद्या फुग्यात क्षमतेपेक्षा जास्त हवा भरल्यानंतर जी स्थिती होते, तशीच काहीशी अवस्था आज 2 कोटी 31 लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईची झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीकास्त्र
मांजरेकर यांच्या या रोखठोक प्रश्नावर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. मुंबईत विकासाच्या नावाखाली सुरू असलेली धावपळ ही प्रगती नसून विनाशाची नांदी असल्याचा आरोप त्यांनी केला. नियोजनाचा अभाव आणि केवळ जाहिरातबाजीसाठी सुरू असलेल्या कामांमुळेच मुंबईची हवा इतकी प्रदूषित झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुंबईला आता नवीन सिमेंट-काँक्रीटच्या विकासाची गरज नसून हे शहर गर्दीमुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे मांजरेकर यांनी ठामपणे सांगितले. बाहेरून येणारे लोंढे थांबवून मुंबईचे मूळ सौंदर्य आणि आरोग्य जपण्याचे आवाहन त्यांनी या मुलाखतीद्वारे केले आहे. या संवादानंतर आता ठाकरे बंधू मुंबईच्या या मूलभूत प्रश्नांवर भविष्यात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


