Nashik Accident: नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगन शिवारात काल दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेत चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य ६ ते ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन नाशिकमार्गे गुजरातच्या वापीकडे जात असताना, चाचडगाव टोलनाका ओलांडल्यावर हा भीषण अपघात घडला. धडक इतकी वेगवान होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
चार महिलांची प्रकृती चिंताजनक
या घटनेतील जखमींना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींमध्ये चार महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा – Buldhana Accident: शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
दुसरीकडे, जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांत झालेल्या इतर दोन अपघातांनी नाशिककरांना हादरवून सोडले आहे. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबेरे गावाजवळ एका रिक्षा आणि मिनीबसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील दीपक डावखर, आकाश डावखर आणि दीपक जाधव या २२ वर्षीय तीन तरुणांचा जागीच अंत झाला. हे तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते आणि तिथून दर्शनासाठी शनिशिंगणापूरला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. तसेच, सटाण्याजवळील ढोलबारे येथे झालेल्या अन्य एका अपघातात नवापूरमधील एका दांपत्याला आपला प्राण गमवावा लागला. एकामागून एक घडणाऱ्या या भीषण दुर्घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


