Zilla Parishad Election : महाराष्ट्रातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा आज (मंगळवार) दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. या घोषणेसोबतच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होईल.
दुपारी ४ वाजता होणार मोठी घोषणा
राज्य निवडणूक आयुक्त दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करतील. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याने, आता संपूर्ण प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. आजच्या घोषणेत मतदानाची तारीख आणि मतमोजणीचा दिवस स्पष्ट होईल.
पहिल्या टप्प्यात ‘या’ जिल्ह्यांचा समावेश
ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, अशाच ठिकाणी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे:
- पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली.
- कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
- मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव.
आरक्षणाचा पेच आणि न्यायालयाचा दिलासा
राज्यातील उर्वरित २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असल्याने, तिथल्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील. दरम्यान, ओबीसी आरक्षण आणि बांठिया आयोगाच्या अहवालाबाबत २१ जानेवारी २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या निकालावर पुढील सर्व निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असेल. आयोगाने ३१ जानेवारीच्या डेडलाईनमध्ये वाढ करण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने मान्य करत १० फेब्रुवारीपर्यंतची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिली आहे.


