PMC Election 2026 : मुंबईत भाजप ९० तर शिवसेना ४० जागांवर विजय मिळवेल, तर पुण्यात आम्ही ११५ पेक्षा कमी जागा घेणारच नाही, असा थेट आणि मोठा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज (१५ जानेवारी २०२६) मतदान प्रक्रिया पार पडत असताना पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. पुण्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना पाटील म्हणाले की, पुणे महानगरपालिकेत ११५ पेक्षा जास्त जागा जिंकून भाजप बहुमताने सत्तेत येईल. त्यांनी प्रभाग २४ मधील गणेश बिडकर आणि इतर सहकाऱ्यांच्या विजयाची खात्री देत विरोधकांना थेट आव्हानही दिले.
मुंबईतील विजयाचे गणित
मुंबई महापालिकेच्या निकालांबाबत त्यांनी आकडेवारी स्पष्ट केली. त्यांच्या मते, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युती मुंबईवर वर्चस्व गाजवेल, ज्यात भाजपला ९० आणि शिवसेनेला ४० जागा मिळतील. २०१४ नंतर राजकारणाची दिशा बदलल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, आता केवळ आरोपांमुळे निवडणूक जिंकता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि विकासाच्या कामावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. विरोधकांचे आरोप हे केवळ ‘पाण्यावरचे बुडबुडे’ असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा – BMC Election 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा निकाल लांबणीवर! काय आहे यामागचं नेमकं कारण ?
विरोधकांवर टीका आणि पक्षांतर्गत भूमिका
अजित पवार गटाशी असलेल्या संबंधांबाबत आणि पक्षाच्या स्थितीबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, भाजप ही लोकशाही मूल्ये मानणारी संघटना आहे. काही नेत्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे आम्ही मधल्या काळात थोडे मागे पडलो होतो, पण आता पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यांना निकालावर पैजा लावायच्या आहेत, त्यांनी खुशाल लावाव्यात. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह सहा महापालिकांमध्ये आमचा विजय निश्चित आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आज सुरू असलेल्या या मतदान प्रक्रियेनंतर आता जनतेचा कौल नक्की कोणाला मिळतो आणि चंद्रकांत पाटलांचा हा आकडा खरा ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


