Mumbai Crime News : बदलापूरमधील धक्कादायक घटनेनंतर आता मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या एका गंभीर प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मालाडमधील एका नामांकित शाळेत शाळेच्या शिपायाने ५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिपायासह शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यालाही अटक केली आहे.
ही घटना १२ जानेवारी रोजी घडल्याची माहिती आहे. शाळेतील शिपायाने मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. भीतीमुळे मुलीने सुरुवातीला हा प्रकार पालकांना सांगितला नव्हता. मात्र, तिच्या वागणुकीत बदल जाणवल्यानंतर पालकांना संशय आला.
पालकांनी विचारपूस केल्यानंतर मुलीने संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार केल्यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांकडून धमकावण्यात आल्याचाही आरोप पालकांनी केला आहे.
मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचा CEO अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्याविरोधात BNS कलम ७४, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १०, १७, २१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे मालाड परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.


