Pune Crime News : पुणे शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात एका सुरक्षारक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर शिवाजी गाडेकर (वय २९, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, मूळ रा. किल्लारी, लातूर) असे आहे. ते हडपसरमधील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी गाडेकर हे नेहमीप्रमाणे “कामावर जातो” असे सांगून डबा घेऊन घराबाहेर पडले होते. मात्र ते ना कामावर पोहोचले, ना घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी हडपसर ग्लायडिंग सेंटर परिसरात एका व्यक्तीने झाडाला गळफास घेतल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करताना मृताच्या खिशात सापडलेल्या वस्तूंवरून त्याची ओळख पटवण्यात आली आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, गाडेकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.


