Raghav Chadha Join BJP: दिल्लीच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) चाणक्य मानले जाणारे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासह संदीप पाठक आणि अशोक मित्तल या तीन दिग्गज नेत्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे हे नेते आता ‘कमळ’ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
केजरीवालांच्या ‘चाणक्या’ने का सोडली साथ?
पक्षांतराचा निर्णय घेतल्यानंतर संदीप पाठक यांनी आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्ही नेहमीच स्वतःपेक्षा पक्षाला आणि अरविंद केजरीवाल यांना मोठे मानले. देशातील लाखो कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून हा पक्ष उभा केला.” मात्र, पक्षात गेल्या काही काळापासून घुसमट होत असल्याचे संकेत त्यांनी दिले असून, पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे भाग पडल्याचे त्यांनी सांगितले.
अपात्रतेची भीती संपली?
राघव चढ्ढा यांनी या बंडाला कायदेशीर स्वरूप दिले आहे. चढ्ढा यांच्या दाव्यानुसार, राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश बहुमत त्यांच्याकडे आहे. संविधानातील तरतुदीनुसार, एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य बाहेर पडल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. या तांत्रिक बळावर त्यांनी आपला गट थेट भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंडाची व्याप्ती वाढणार; आणखी ४ खासदारांचा पाठिंबा?
केवळ हे तीनच नव्हे, तर पक्षाचे इतर मोठे चेहरेही आमच्या संपर्कात असल्याचा दावा चढ्ढा यांनी केला आहे. यामध्ये हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रमजित सिंग साहनी आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांचाही समावेश असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. जर हा दावा खरा ठरला, तर राज्यसभेत आम आदमी पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. एकीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांशी झुंजत असताना, दुसरीकडे पक्षातील अंतर्गत फुटीमुळे ‘आप’च्या गोटात चिंतेचे सावट पसरले आहे.


