Vidhan Parishad Election 2026: राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये 16 नियमित जागांसह नागपूरच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि निवडणूक कार्यक्रम
प्रदीर्घ काळ रिक्त राहिलेल्या या जागांसाठी आता खालीलप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे:
- निवडणूक अधिसूचना: 25 मे 2026
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 1 जून 2026
- अर्जांची तांत्रिक छाननी: 2 जून 2026
- अर्ज माघारी घेण्याची मुदत: 4 जून 2026
- मतदान प्रक्रिया: 18 जून (सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत)
- मतमोजणी व निकाल: 22 जून 2026
निवडणुकीचे समीकरण आणि विलंब का झाला?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे या जागा रिक्त होत्या. नियमानुसार, संबंधित मतदारसंघात किमान 75% मतदार (लोकप्रतिनिधी) उपलब्ध असल्याशिवाय ही निवडणूक घेता येत नाही. आता ही अट पूर्ण झाल्याने आयोगाने मतदानाची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नागपूर जागेवरही याच वेळी पोटनिवडणूक होणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक
सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर.


