पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC) चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगांवकर यांना अटक केली आहे. रविवारी सायंकाळी पुण्यातील सीबीआय कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
पेपरफुटी रॅकेटमध्ये सक्रिय सहभागाचा आरोप
सीबीआयच्या प्राथमिक तपासात शिवराज मोटेगांवकर हे पेपर लीक प्रकरणातील संघटित टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले आहे. तपासानुसार, परीक्षेपूर्वीच त्यांनी NEET चे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती.
मोबाईलमध्ये सापडले लीक प्रश्न
१४ मे रोजी लातूर येथील त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तपास यंत्रणेला त्यांच्या मोबाईलमध्ये लीक झालेली प्रश्नपत्रिका आढळून आली. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना आणि इतर संबंधितांना पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न
सीबीआयच्या तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. परीक्षा झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका हटवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती देण्यासही त्यांनी टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे.
गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल
मोटेगांवकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PC Act) आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणूक, गुन्हेगारी कट आणि परीक्षेतील गैरप्रकारांना मदत केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्तुळात खळबळ
या अटकेनंतर लातूरसह राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे आणि आणखी कोण कोण यात सहभागी आहे, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे.


