Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियातील महायुतीच्या सत्कार समारंभात 2014 च्या निवडणुकीदरम्यानच्या राजकीय खेळीचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 मध्येच भाजपने शिवसेनेचा हात सोडण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला होता.
हा निर्णय शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने घेतला गेला होता, परंतु काही कारणांमुळे ही योजना पूर्णपणे प्रत्यक्षात येऊ शकली नाही. या खुलाशाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट
पटेल म्हणाले, “2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. आमच्या सहकार्यामुळे हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर गडबड झाली आणि आम्ही मागे राहिलो, तर तुम्ही (भाजपा) पुढे निघून गेलात.” त्यांनी यावेळी मंचावर उपस्थित भाजप आमदारांना टोला लगावत हलक्या-फुलक्या शैलीत हा राजकीय इतिहास उलगडला.
पटेल यांनी पुढे सांगितले की, शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला भाजपसोबत येण्याची इच्छा होती, परंतु “गाडी स्लीप होऊन गेली,” म्हणजेच काही तांत्रिक अडचणी आणि परिस्थितीमुळे हा निर्णय पूर्णत्वास गेला नाही. त्यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील गुप्त चर्चेचा उल्लेख केला, ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी आपापल्या तत्कालीन युती भागीदारांचा (भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस) हात सोडण्याचे ठरवले होते.
दोन्ही युती तुटल्यानंतर, 2014 च्या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निकालानंतर भाजपने 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आले, आणि शिवसेनेने 63 जागा जिंकल्या. निवडणुकीनंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत आली आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला, परंतु सरकारमध्ये सहभागी झाली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती नाही
पटेल यांनी भंडारा येथील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “जिथे युती शक्य असेल तिथे युती करू, पण युतीचा विचार डोक्यातून काढून टाका. जिथे आपली ताकद आहे, तिथे आपण स्वतःचा उमेदवार उभा करू. मागील निवडणुकीत दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी यावेळी आपली ताकद असेल तर लढायचे.” त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागात स्वतःचा उमेदवार उभा करून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले.


