Manoj Jarange & Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदू धर्म आणि सणांच्या नावाखाली मराठा समाजाची अडवणूक केल्याचा गंभीर आरोप करत, जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना थेट सवाल केला आहे.
“हिंदू धर्माच्या आडून मराठ्यांचा छळ का? फडणवीसांना यासाठीच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे का?” बुधवारी (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले. येत्या 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र
जरांगे यांनी फडणवीसांवर हिंदू सणांचा गैरफायदा घेऊन मराठा आंदोलकांना त्रास दिल्याचा आरोप केला. “आम्ही हिंदू आहोत, पण गणेशोत्सवासारख्या सणांच्या नावाखाली आम्हाला रोखले जात आहे. ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्वाची गरज आहे, ते खोटे हिंदू मराठ्यांवर अन्याय करत आहेत,” असं मनोज जरांगे यांनी सांगितले.
फडणवीसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवीन कायदा आणल्याचा आणि मराठा मोर्चाला खीळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर दावा जरांगे यांनी केला. “काल दुपारी 3 वाजता निकाल आला आणि आज आम्हाला मुंबईला निघायचे आहे. फडणवीसांनी दहशतवाद्यांसारखे डाव खेळले. इंदिरा गांधींच्या काळातही आंदोलकांना असे अडवले नव्हते,” अशी खरमरीत टीका जरंगे यांनी केली.
कायदेशीर अडथळ्यांचा दावा
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी थेट नाकारलेली नसली, तरी 2025 च्या नव्या कायद्याच्या आधारे परवानगीसाठी अर्ज आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जरांगे यांनी सांगितले की, त्यांचे वकील परवानगीसाठी अर्ज करत असून, आंदोलन पूर्णपणे कायदेशीर मार्गाने होईल.
“आम्ही अनेक दिवसांपासून मुंबई मोर्चाची माहिती देत होतो. आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. तरीही फडणवीसांच्या लोकांनी याचिका दाखल करून नवीन कायदा पुढे केला आणि परवानगी नाकारली. आम्हाला नोटीसही देण्यात आली नाही. ही लोकशाही नाही,” असं त्यांनी ठणकावले.
ही आरपारची लढाई
जरांगे म्हणाले, आज आपण मुंबईकडे निघायचे आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होईल. सरकार आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करेल, खुनशी वागणूक देईल, पण आपण शांत राहायचे. ही आरपारची लढाई आहे. कितीही वेळ लागला, तरी संयम सोडायचा नाही. जगाच्या पाठीवर न झालेली ही लढाई शांततेने आणि डोक्याने जिंकायची आहे,” असं त्यांनी सांगितले


