आजकाल ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय वाढला आहे. अनेक कंपन्यांकडून असा पर्याय आपल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे आता बहुतांश घरात वायफाय राउटर आहेत. मात्र, असे असूनही, इंटरनेट स्पीडबद्दल तक्रारी कायम आहेत. काही राउटरचा स्पीड कासवापेक्षाही कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. असे असताना काही बदल केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये व्यत्यय, वेबपेज उघडण्यास उशीर आणि वारंवार नेटवर्क डिस्कनेक्ट होणे ही सामान्य समस्या बनली आहे. बऱ्याचदा लोक याला कंपनीची खराब सेवा म्हणून दुर्लक्ष करतात. पण, खरे कारण घराच्या आत राउटरची चुकीची जागा आणि त्याच्या जवळ ठेवलेल्या वस्तू असू शकतात. सिग्नलचा सर्वात मोठा शत्रू वायफाय रेडिओ लहरींवर काम करते.
जर राउटरजवळ मोठे आरसे असतील तर सिग्नल परावर्तित होऊन दिशा बदलू शकतो आणि कव्हरेज कमी होते. त्याचप्रमाणे, धातू (लोखंड-स्टील) देखील रेडिओ लहरींना ब्लॉक करते, ज्यामुळे नेटवर्क कमकुवत होते. म्हणून, राउटर कधीही काचेच्या किंवा धातूच्या वस्तूंजवळ ठेवू नये.
स्पीकर, माउस, कीबोर्ड सारखी ब्लूटूथ डिव्हाईसेस देखील वायफायवर परिणाम करतात. प्रत्यक्षात, ब्लूटूथ आणि वाय-फाय दोन्ही 2.4 GHz फ्रिक्वेन्सीवर काम करतात. अशा परिस्थितीत, व्यत्यय वाढतो आणि इंटरनेटचा वेग कमी होतो. ब्लूटूथ गॅझेट्स राउटरपासून काही अंतरावर ठेवणे चांगले. याने फायदा होऊ शकतो.
राउटर फर्निचर आणि कपाटांमध्ये ठेवू नका
जर राउटर लाकडी रॅक किंवा कपाटात ठेवला असेल तर सिग्नल योग्यरित्या बाहेर पडू शकत नाही. यामुळे कव्हरेज विक होते आणि वारंवार कनेक्टिव्हिटी तुटू शकते. राउटर नेहमी मोकळ्या आणि उंच ठिकाणी बसवावा जेणेकरून सिग्नल सर्व दिशेने समान प्रमाणात पसरेल.


