नागपूर: गेल्या काही दिवसांपासून कप सिरप प्यायल्याने अनेक चिमुकल्यांना आपल जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 18 महिन्यांची धानी दहरिया हिचा सोमवारी रात्री नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) मृत्यू झाला. त्यामुळे विषारी कफ सिरप प्रकरणातील मृतांचा आकडा आता 15 वर पोहोचला आहे. GMCH च्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानी गेल्या काही दिवसांपासून गंभीर कोमात होती.
डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले की, विषारी कफ सिरप घेतल्यामुळे तिचे मूत्रपिंड निकामी झाले आणि त्यामुळे मेंदूवर गंभीर परिणाम झाला. त्यामुळेच मुलगी कोमात गेली होती. उपचारांदरम्यान मुलीचे मूत्रपिंडाचे कार्य पुन्हा सुरू झाले होते, परंतु तिची एकूण शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक होती.
हेही वाचा – Cough Syrup: कफ सिरप प्यायल्याने किडनी झाली निकामी! आतापर्यंत 6 चिमुरड्यांचा मृत्यू
वडिलांची वेदनादायक कहाणी
धानीचे वडील नवीन दहरिया यांनी सांगितले की, आमच्या मुलीने लघवी करायला सुरुवात केली होती. पण तिच्या शरीरात युरियाचे प्रमाण खूप जास्त होते. प्रकृती सुधारत असल्याचे वाटत असतानाच ती अचानक कोसळली.
विषारी कफ सिरप –
या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे. विषारी कफ सिरपमुळे मुलांचे जीव गेले असून, औषध तयार करणाऱ्या कंपनीविरुद्ध तपास तीव्र झाला आहे. आरोग्य विभागाने संबंधित औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.


