बीड: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशावरून सुरू झालेल्या चर्चेला आता नवं वळण मिळालं आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या विधानानंतर केवळ मुंडे समर्थकांचाच नव्हे, तर इतर नेत्यांचाही संताप उसळला आहे. प्रकाश महाजन यांनी भुजबळांना सल्ला देत म्हटलं की, मुंडे कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र आलं आहे. त्यांच्या नात्यात पुन्हा दरी निर्माण होईल असं बोलणं टाळावं. तसेच, त्यांनी उपरोधिक भाषेत भुजबळांना टोला लगावला दुसऱ्यांच्या घरात वारस कोण हे ठरवण्याआधी स्वतःच्या घरात मुलगा वारस की पुतण्या, हे ठरवा. महाजन यांनी ठामपणे सांगितलं की, पंकजा मुंडे यांना संघर्षातून समाजानं वारसदार म्हणून मान्यता दिली आहे. तथापी, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी देखील यावर वक्तव्य केलं आहे.
भुजबळांनी संस्कार दाखवावेत – जरांगे पाटील
या वादावर आता मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देशासाठी काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर असला पाहिजे. भुजबळ बीडला आले आणि भेद पसरवून गेले. मुंडे कुटुंबाला हिणवायचं आहे का तुम्हाला? जरांगे यांनी पुढे भुजबळांना थेट सुनावत म्हटलं, संस्कारहीन वर्तन केलं जाऊ नये. समाजात फुट पाडणारे लोक तुमच्याभोवती जमले आहेत, पण महाराष्ट्र अशा बोलण्याला सहन करणार नाही.
हेही वाचा – ‘मुंडक्यावर पाय द्यावा लागेल…’; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले? जाणून घ्या
पंकजा मुंडेच खऱ्या वारसदार
दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपल्या वक्तव्यात धनंजय मुंडेंवर कठोर शब्दांत टीका करत पंकजा मुंडेंना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, मुंडे घरात फूट धनंजय मुंडेंनीच निर्माण केली. त्यांच्या वर्तनामुळेच गोपीनाथरावांना मान खाली घालून चालावी लागली. खरा वारस तो असतो, जो वडिलांच्या आदर्शाशी चालतो. जरांगे पाटील पुढे म्हणाले, पंकजा मुंडे वारसदार नाही, तर मग कोण आहे? नुसती बहीण म्हणत गळ्यात हात टाकून काही होत नाही. त्यांना खऱ्या अर्थानं आपलं समजणं गरजेचं आहे.
भुजबळांच्या विधानानंतर सुरू झालेला वाद आता मुंडे कुटुंबाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. एकीकडे पंकजा समर्थक त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत असताना, दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.


