मुंबई : टीव्ही अभिनेत्री अविका गोर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये मिलिंद चंदवाणीशी लग्न केल्यानंतर, तिने आता बँकॉकला एक नवीन घर विकत घेऊन तिथेच ती शिफ्ट झाली. फॅन्स आता प्रश्न विचारत आहेत की ती आता चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करणे थांबवणार का. यावर, अविकाने उत्तर दिले आहे.
अविका गोरने खुलासा केला आहे की, तिने आणि तिच्या पतीने नुकतेच बँकॉकला एक घर खरेदी केले आहे. ती सध्या घर सजवण्यात व्यस्त आहे. मिलिंदच्या कामामुळे तिला बँकॉकला स्थलांतरित व्हावे लागले. जेव्हा जेव्हा अविका बँकॉकला जायची, तेव्हा तिला सुट्टीवर असल्यासारखे वाटायचे. तिला ते ठिकाण खूप आवडले, म्हणूनच तिने ते घर विकत घेतले. मिलिंदसोबतच्या तिच्या सात वर्षांच्या नात्यात त्यांनी एकमेकांच्या प्रगतीला महत्त्व दिले आहे आणि एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा दिला आहे. जेव्हा कधी तिला एखाद्या प्रोजेक्टसाठी दूर जावे लागत असे, तेव्हा मिलिंद तिच्या मदतीला धावून येत असे.
आता, मिलिंदने त्याच्या करिअरमध्ये मागे पडू नये, अशी तिची इच्छा आहे. चित्रपटांसाठी ती केवळ मुंबईतच नाही, तर हैदराबाद, राजमुंद्री आणि विशाखापट्टणम येथेही चित्रीकरण करत असे. बँकॉक हे आता तिचे नवीन घर आहे. मात्र, ती पूर्वीप्रमाणेच तिचे काम सुरू ठेवणार आहे. तिच्या कामामुळे ती अनेकदा हैदराबाद आणि मुंबईत असते आणि काम हे तिचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तिला जे काही काम मिळते, ते तिच्या वेळापत्रकानुसार जुळते.


