Vaishno Devi Temple: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीरमधील पर्यटन स्थळांनी पांढरा शुभ्र साज परिधान केला आहे. रियासी जिल्ह्यातील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिरात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली असून, त्रिकुटा पर्वत रांगा बर्फाच्या चादरीने न्हाऊन निघाल्या आहेत. या मनमोहक दृश्यामुळे तीर्थक्षेत्राचा परिसर अत्यंत विलोभनीय दिसत आहे.
पर्यटन स्थळांवर बर्फाचा थर
केवळ वैष्णोदेवीच नव्हे, तर भादरवाह खोरे, पटनीटॉप, नाथाटॉप, सनासर आणि बटोटे यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवरही जोरदार हिमवृष्टी झाली आहे. शुक्रवारी सकाळी नागरिक जागे झाले तेव्हा चहूबाजूंनी पसरलेला बर्फ पाहून त्यांना सुखद धक्का बसला. या बर्फवृष्टीमुळे पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालक, टॅक्सी चालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या आशा उंचावल्या असून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
आरोग्य आणि शेतीसाठी ‘वरदान’
हवामान तज्ज्ञांच्या मते, ही बर्फवृष्टी आणि पाऊस पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. बर्फवृष्टीमुळे हवेतील धूळ आणि प्रदूषण कमी झाल्याने नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तसेच भूजल पातळी वाढल्याने कोरडे पडलेले नैसर्गिक झरे आणि विहिरी पुन्हा प्रवाहित होतील.फळबागा आणि भाजीपाला उत्पादनासाठी ही बर्फवृष्टी पोषक असून, यामुळे भविष्यातील वीज टंचाईवर मात करण्यासही मदत होईल.
Jai Mata Di …!!!
Season’s first snowfall at shri Mata Vaishno Devi Bhawan.
Devotees were blessed to witness breathtaking weather as fresh snow gently adorned the holy surroundings of Maa Vaishno Devi Bhawan and Bhairon Temple, filling the atmosphere with serenity, devotion,… pic.twitter.com/DVQZ38IaYQ— Shri Mata Vaishno Devi Shrine Board (@OfficialSMVDSB) January 23, 2026
दरम्यान, निसर्गाचे हे रूप सौंदर्यासोबतच काही अडचणीही घेऊन आले आहे. काश्मीर खोऱ्यातील मुसळधार हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार बर्फामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून रस्ते बर्फाखाली गाडले गेले आहेत. खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरील २६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनंतनाग आणि पूंछ भागात जोरदार वाऱ्यासह झालेल्या हिमवृष्टीमुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. पूंछमध्ये बर्फात एक बस अडकल्याचीही माहिती समोर आली आहे.


