Mangalprabhat Lodha: मलबार हिलमधील जैन मंदिरांना सणासुदीसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादावर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अखेर मौन सोडले आहे. “लोक मदतीसाठी माझ्याकडे आले आणि मी त्यांना सिलेंडर मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तर त्यात माझे काय चुकले?” असा आर्त सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे.
नेमका वाद काय?
मंत्री लोढा यांनी मलबार हिलमधील १६ जैन मंदिरांच्या उत्सवासाठी प्रत्येकी ५ गॅस सिलेंडर देण्याची शिफारस करणारे पत्र प्रशासनाला दिले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर ‘विशिष्ट धर्माची बाजू’ घेतल्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली होती. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेत गॅस एजन्सींना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता.
लोढांचा ‘व्हिडीओ’मधून पलटवार
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी लोढा यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.हिंदू सण किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी टीका करणे ही आता एक फॅशन झाली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा आणि जैन धर्मीयांचे मोठे कार्यक्रम असतात. अशा वेळी गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून प्रयत्न करणे ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. लोढा पुढे म्हणाले की, “पुढच्या महिन्यात हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या कार्यक्रमांसाठीही मला विशेष प्रयत्न करावेच लागणार आहेत. कुणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा, मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही.”
राज्यात गॅसचा तुटवडा नाही
लोढा यांनी स्पष्ट केले की, राज्यामध्ये गॅसचा कोणताही तुटवडा नाही आणि सरकार उत्तम काम करत आहे. केवळ मोठ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी एकाच वेळी जास्त सिलेंडरची गरज भासते, त्यासाठीच हा पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. “विनाकारण समाजात तेढ निर्माण करू नका,” असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.


