बीड: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी बीडमधील केज परिसरात आयोजित मोर्चा संबोधित करत ओबीसी समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला. वाघमारे म्हणाले की, ‘जर आमचा ग्रामपंचायत सदस्य चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही. त्यामुळे यापुढे ओबीसींनी फक्त ओबीसींनाच मतदान करावे.’ मोर्चादरम्यान वाघमारे यांनी भाजपचे आमदार सुरेश धसांवरही टीका केली. त्यांनी सांगितले की, ‘आष्टीचा जब्या विधानसभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे परत जाईल. त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करू,’ असा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे.
शरद पवारांवरही टीका
वाघमारे यांनी शरद पवारांच्या धोरणांवरही सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, ‘मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाला आम्ही कधीही विरोध केला नाही, पण बारामतीच्या करामतींमुळे ओबीसींना अडचणींचा सामना करावा लागला. आता ‘करो व मरो’ची परिस्थिती आहे. आमचे ओबीसी आरक्षण खायला आले म्हणजे आमच्याही अधिकारांवर परिणाम झाला.’
सुरेश धसांवर टीका
दरम्यान, वाघमारे म्हणाले की, ‘मनोज जरांगे, छगन भुजबळ आणि पंकजा ताईंवर बोलतोय, पण त्याची लायकी आहे का? आष्टीच्या जब्याला पुन्हा पंकजा ताईं आणि धनंजय मुंडेंकडे येईल. निजामाच्या विचाराच्या लोकांना आता मतदान करायचे नाही. याने जर थोडी दाढी वाढवली तर हा निजामासारखा दिसेल. याला निजामी गॅझेट नुसार आरक्षण पाहिजे.’
निझाम गॅझेटवर सवाल
तथापी, वाघमारे यांनी निझाम गॅझेटवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सरकारला संविधान मान्य नसल्यास हैदराबाद गॅझेट कसे लागू करू शकते? धनगर आणि बंजारा समाजाने अनेक वर्षे आंदोलन केले, त्यावेळी हे गॅझेट कधी लागू झाले नाही. आपण छत्रपतींच्या विचारांचे वारस आहोत. हे निजामाकडे कशाला गेले होते?
दलित, मुस्लिम आणि ओबीसींनी एकत्र येणे गरजेचे
नववाथ वाघमारे यांनी म्हटलं की, मनोज जरांगेच्या व्यासपीठावर पाठिंबा देणे फक्त काही लोकांचे काम असू नये. दलित, मुस्लिम आणि ओबीसींनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांत प्रमाणपत्रांचे वितरण केले, त्याची चौकशी करावी. आमच्या आंदोलनाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे, असंही वाघमारे यांनी यावेळी नमूद केलं.
दसऱ्यानंतर मुंबईकडे जाण्याचा इशारा
दसऱ्यानंतर सर्वांशी चर्चा करून मुंबईकडे जाण्याचा इशाराही यावेळी नवनाथ वाघमारे यांनी दिला. त्यांनी स्पष्ट केले की, ओबीसी समाज जर मुंबईत गेला, तर राज्य सरकारला झुंडशाहीची खरी ताकद समजेल.


