परभणी: राज्यात गेल्या काही महिन्यात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ स्विफ्ट आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात वसमत तालुक्यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असल्याचं दिसून येतं.
स्विफ्ट डिझायर- क्रेटा कारचा अपघात
बाबाराव साखरे हे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक – एमएच 38 एडी 3541 या वाहनातून आरळ येथून परभणीच्या दिशेने येत असताना समोरून येत असलेली क्रेटा कार क्रमांक – एमएच 22 बीसी 7888 च्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बाबाराव दतराव साखरे, विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ ता. वसमत) या तिघांचा घटनास्थळीच मुत्यू झाला असून त्यांच्या सोबतचे साईनाथ रामचंद्र काकडे, हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस घटनास्थळी
दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सखाराम सटवाजी साखरे रा. आरळ ता. वसमत यांच्या फिर्यादीवरून क्रेटा कार क्रमांक एमएच 22 बीसी 7888 च्या चालकावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अनुच्छेद 106(1), 281, 125(अ) आणि 125(ब) नुसार ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ताडकळसचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.


