मुंबई: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचे गंभीर चित्र मांडले आहे. त्यांनी सांगितले की यंदाची आपत्ती भयानक असून अजूनही अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या संकटामुळे केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर सर्वसामान्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे प्रचंड ओझे असून, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जमीन पुन्हा उत्पादनक्षम करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षे लागतील, त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले.
सरसकट कर्जमाफी करा –
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतात काहीच उरलेले नाही, त्यामुळे सरकारने प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी. तसेच, व्याज देणाऱ्या वित्तीय कंपन्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवू नयेत, यासाठी सरकारने आदेश जारी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या उदाहरणाचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. बिहारमधील 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा करता, पण महाराष्ट्राने तुम्हाला कठीण काळात साथ दिली तेव्हा इथल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. याशिवाय, त्यांनी बँकांकडून शेतकऱ्यांना जाणाऱ्या नोटिसा थांबवण्याचीही मागणी केली.


