Local Body Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला एकही जागा देणार नाही, असा ठाम निर्धार अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केला आहे. चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य करताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पाडण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करून पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले, असा गंभीर आरोप करत आत्राम म्हणाले, “मला पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी त्यांना एक तुकडाही देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत फक्त घड्याळच चालेल आणि एकही जागा दुसऱ्या पक्षाला जाईलच नाही.”
गेल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत यश-अपयश पाहिले, पण जनतेच्या विश्वासाने विधानसभा गड राखला, असे सांगत आत्राम यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. “विधानसभेत मला पराभूत करण्यासाठी भाजपने पुतण्या अम्ब्रीशरावांना डमी कॅंडिडेट बनवले आणि तब्बल पाच कोटी रुपये खर्च केले. तरी जनतेने माझ्या पाठीशी उभे राहून विजय दिला,” असे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा प्रस्ताव आला तर ५१ पैकी ३२ जागा मागू, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर सर्व जागा लढेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व १९ जागांवर पक्ष लढेल, असे सांगून त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली, अहेरीत इतर पक्ष आहेतच कुठे? असंही धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.
शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका
आत्राम यांनी कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्याने रोजगार मिळावा, अशी मागणी केली. भेंडाळा परिसरातील १४ गावांच्या शेतजमिनी उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगत ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. एक इंचीही जमीन जाणार नाही. कोणी दबाव आणला तर ते खपवून घेणार नाही.” यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.
मिटकरींची शेतकऱ्यांबाबत भूमिका
सभेत बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, पण महायुती सरकारने भरीव मदत केली. पुढेही सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे.” गडचिरोली हा क्रांती आणि संघर्षाचा जिल्हा असून, येथील सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महायुतीतील तणाव वाढला
हे वक्तव्य महायुतीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आधीच तणाव असताना आले आहे. स्थानिक निवडणुकीत युती कायम राहील की फुटेल, याबाबत अनिश्चितता वाढली आहे. अजित पवार गटातील इतर नेतेही स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहेत, यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका निवडणुका लवकर घेण्याचे निर्देश दिले असले तरी जागा वाटपावरून राजकीय घमासान सुरू आहे.


