Tathawade Land Scam: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात त्यांच्या अमेडिया कंपनीवर मोठ्या घोटाळ्याचे आरोप झाले असून, या व्यवहारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या कंपनीने १८०० कोटी रुपयांच्या बाजारमूल्याची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी करण्यात आली, इतकेच नव्हे तर ६ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरायची असताना फक्त ५०० रुपयेच जमा करण्यात आले, हेही उघड झालं आहे. या प्रकरणामुळे पार्थ पवार अडचणीत सापडले असताना आता पुणे जिल्ह्यातून आणखी एक शासकीय जमीन विक्री घोटाळा समोर आला आहे.
ताथवडे येथे मोठा जमीन घोटाळा
ताथवडे येथील १५ एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील पशुसंवर्धन विभागाच्या सर्वे नंबर २० मधील ही जमीन हेरंब गुपचूप या व्यक्तीने जानेवारी २०२५ मध्ये कोट्यवधी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पशुसंवर्धन विभागाला कोणतीही पूर्वकल्पना न देता ही विक्री करण्यात आली.
हेही वाचा – पार्थ पवार जमीन घोटाळ्याची चौकशी तुकाराम मुंढेंकडून? काँग्रेसची मोठी मागणी
मुद्रांक शुल्क विभागाने जेव्हा व्यवहाराची माहिती विभागाला दिली, तेव्हा पशुसंवर्धन आयुक्तांनी तातडीने पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून शासकीय जमिनीचा गैरव्यवहार पुन्हा एकदा उघड झाला आहे. आता या गैरव्यवहारात कोण सामील आहे, आणि जबाबदारांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


