पुणे : पुणे मुंढव्यातील १८०० कोटी रुपयांच्या सरकारी जमिनीवर अवघ्या ३०० कोटींना अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने ताबा मिळवल्याच्या घोटाळ्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात स्टॅम्प ड्यूटी विभागाने ४३ कोटींची नोटीस जारी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे.
या घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर भेदभावपूर्ण कारवाईचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे. “फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा ‘गेम’ करायचा असेल त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.
भेदभाव न करता कारवाई व्हावी : रोहित पवार
रोहित पवार यांनी म्हटले की, “कुठलाही नेता असो किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती असो, चूक केली असेल तर योग्य कारवाई झाली पाहिजे. पण ही कारवाई भेदभावपूर्ण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “हे सरकार जेव्हा आम्ही प्रकरण पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही.
पण भाजपला एखाद्या नेत्याचा ‘गेम’ करायचा असेल तर लगेच सुपरफास्ट कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले, सरकारच्या विभागानेही सांगितले तरी संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली नाही. पण या पुणे जमीन घोटाळ्यात सुपरफास्ट अॅक्शन घेतले जाते. भेदभाव न करता, जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे, अशी कारवाई व्हावी.”
अवैध कारवायांसाठी कोण जबाबदार?
रोहित पवार यांनी सांगितले की, “अवैध काम करत असाल तर सत्ताधारी नेत्यांचे नातेवाईक असो वा विरोधकांचे, व्यावसायिक असो वा कोण असो, कारवाई झाली पाहिजे. शहानिशा होऊन काय खरं-खोटं हे लोकांसमोर यावे. पण कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नाही, त्याला अधिकाऱ्यांचा पाठिंबा असतो.
ते अधिकारी काही लोकांना प्राधान्य देतात का? गरीबांच्या कामाची का होत नाही? या सगळ्यांची चौकशी महत्त्वाची आहे.” त्यांनी पुन्हा सांगितले की, “कुठल्याही नेत्याच्या कुटुंबातील व्यक्तीने चूक केली तर योग्य कारवाई व्हावी, पण भेदभाव नको.” असं रोहित पवार म्हणाले.


