Pune Accident: कर्वे रोडवरील नॉनस्टॉपजवळील पेट्रोल पंप परिसरात आज दुपारी सुमारे 2.30 वाजता झालेल्या भीषण अपघातात पीएमपी बसने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, यात रिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले. कोथरूडवरून कात्रजच्या दिशेने जाणारी ही बस अचानक अनियंत्रित झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
हेही वाचा – पुणे-बेंगळुरू महामार्गावर बसचा भीषण अपघात, ५५ विध्यार्थ्यांना घेऊन गाडी 20 फूट खाली कोसळली
रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी
या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परतेने जखमींना रिक्षेतून बाहेर काढून तात्काळ जवळील सह्याद्री रुग्णालयात हलवले. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. नागरिकांनी संताप व्यक्त करत पीएमपी बसचालकाला मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस तातडीने धाव घेत नागरिकांना शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
हेही वाचा – पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरुचं; स्कूल बस अन् कारची धडक
अपघाताचे नेमके कारण बसचालकाची चूक, वेग किंवा वाहनातील बिघाड यापैकी काय होते? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून पुढील चौकशी गतीमान करण्यात आली आहे. या घटनेमुळे कर्वे रोडवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस आणि वाहतूक नियंत्रण दलाने स्थिती सुरळीत करण्यासाठी पावले उचलली असून पुढील तपास सुरू आहे.


