Today Weather News : महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होत असून उकाडा वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून अनेक भागांत अंशतः ढगाळ हवामान आहे. सकाळच्या वेळेत दाट धुके तर रात्री उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज, २३ जानेवारी रोजी राज्यातील तापमानात चढ-उतार जाणवणार आहेत. सकाळी गारठा आणि दुपारच्या वेळेत उन्हाचा कडाका अशी स्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ होत असून, धुळे, नाशिक आणि निफाड परिसरात तापमान १० अंशांच्या वर गेल्यामुळे थंडी कमी होऊन उकाडा वाढल्याचे जाणवत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात असेच चढ-उतार सुरू राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
तापमानातील सततच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप यांसारख्या आजारांत वाढ होत आहे. यासोबतच बदलत्या हवामानाचा फटका शेतकरी वर्गालाही बसत असून शेतीवर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.


