Captain Shambhavi Pathak: नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा प्रत्यय बारामतीच्या विमान अपघाताने दिला आहे. राजकारणातील एका मोठ्या नेतृत्वासोबतच, आकाशात झेपावण्याची जिद्द बाळगणाऱ्या एका तरुण महिला वैमानिकाचा प्रवासही कायमचा थांबला. सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी उड्डाणापूर्वी पहाटे ६:३४ वाजता आपल्या आजीला पाठवलेला एक छोटासा संदेश आता त्यांच्या कुटुंबासाठी जन्मभराचे दुःख बनला आहे.
‘दद्दा’साठी तो अखेरचा संदेश
शांभवीच्या आजी, मीरा पाठक आपल्या लाडक्या नातीच्या आठवणीने खचून गेल्या आहेत. शांभवी त्यांना ‘दादी’ न म्हणता प्रेमाने ‘दद्दा’ म्हणायची. “ती कधीही मला सकाळी मेसेज करायची नाही, पण त्या दिवशी अनपेक्षितपणे तिचा मेसेज आला— ‘हाय दद्दा, गुड मॉर्निंग.’ मीही लगेच ‘गुड मॉर्निंग चिनी’ म्हणून उत्तर दिले. पण तो संवाद आमचा शेवटचा ठरेल, असं वाटलंही नव्हतं,” अशा शब्दांत आजीने आपला टाहो फोडला.
हवाई दलाचा वारसा अन् जिद्दीचं उड्डाण
शांभवीच्या नसानसात देशसेवा आणि आकाशाची ओढ होती. त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतीय हवाई दलाशी जोडलेले आहे. आजोबा किशन पाठक विंग कमांडर होते, तर वडील विक्रम पाठक ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. न्यूझीलंडमधून व्यावसायिक वैमानिकाचे शिक्षण पूर्ण केलेल्या शांभवीने लंडन, रशिया आणि दिल्लीच्या आकाशातही विमाने उडवली होती. अवघ्या २५ व्या वर्षी तिने कठीण अशा ‘ATPL’ परवान्यासह स्वतःची ओळख निर्माण केली होती.
कर्तव्य आणि प्रेम जपलं!
शांभवी केवळ एक हुशार वैमानिक नव्हती, तर ती एक अत्यंत हळवी आणि जबाबदार नात होती. गेल्या वर्षी आजोबांच्या निधनानंतर, आजीला एकटे वाटू नये म्हणून ती सलग १३ दिवस त्यांच्या सोबत राहिली होती. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावरही तिने आजीसोबत निवांत वेळ घालवला होता.


