अमरावती: शहरात घडलेली एक धक्कादायक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे सुरू असलेल्या एका विवाह सोहळ्यात चक्क नवरदेवावरच जीवघेणा हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. साधारण पाहुण्यांचा रुसवा-फुगवा वा गोंधळ हे लग्नकार्यांत नेहमीच दिसून येते, मात्र येथे गोष्ट थेट रक्तरंजित वळणावर गेली.
दरम्यान, मंगळवारी रात्री बडनेरातील सुजल समुद्रे यांच्या विवाह सोहळ्यात दोन युवकांनी अचानक स्टेजवर चढून सुजल याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर नवरदेव गंभीर जखमी झाला, तर नववधू आणि नवरदेवाची आई धक्क्याने बेशुद्ध पडल्या. संपूर्ण प्रकार ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला असून या व्हिडिओमुळे घटनेचा थरार स्पष्ट झाला आहे.
हेही वाचा –आईच्या मृत्यूनंतर राग अनावर! रुग्णाच्या नातलगाचा कूपर रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला
हल्ल्यानंतर आरोपी दोघेही घटनास्थळावरून दुचाकीवर बसून फरार झाले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी केला असता, त्यांच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या सुजल समुद्रे यांना उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असले तरी कुटुंब अजूनही दहशतीच्या सावटाखाली आहे. परिणामी विवाह सोहळा अर्धवट ठेवून थांबवावा लागला. नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा बडनेरातील दोन युवकांसोबत वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी लग्नात येऊन गोंधळ घालण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपींना तातडीने पकडून कठोर कारवाई करावी, तोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


