नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) १२ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण बैठकीत (एसजीएम) जय शाह आणि आशिष शेलार यांच्या जागेवर नवे सचिव आणि कोषाध्यक्ष यांची निवड होणार आहे.
बीसीसीआयच्या घटनेनुसार, कोणत्याही रिक्त जागेवर नियुक्तीसाठी विशेष बैठक (एसजीएम) बोलावून ४५ दिवसांच्या आत निवड होणे आवश्यक असते. म्हणजेच, निर्वाचित पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर विशेष बैठक आयोजिण्यासाठी आणि उत्तराधिकारी निवडण्यासाठी मंडळाकडे ४५ दिवसांचा अवधी असतो. त्याप्रमाणे ४३ दिवसांतच विशेष बैठक होत आहे. एका प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षाने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, उर्वरित समितीच्या बैठकीनंतर एसजीएमची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. १२ जानेवारीची एसजीएम बीसीसीआय मुख्यालयात होणार आहे.
न्यायालयाने मंजूर केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार एका व्यक्तीला दोन पदांवर राहता येत नाही. शाह यांचा कार्यकाल एक वर्षासाठी बाकी होता. तसेच लोढा समितीच्या शिफारशीनुसार, कोणताही मंत्री किंवा जनसेवक यांना बीसीसीआयचा पदाधिकारी होता येत नाही. जय शाह (सचिव) यांनी १ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली; तर आशिष शेलार (कोषाध्यक्ष) यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे या दोन जागा रिक्त आहेत.


