Santosh Pandit: सोशल मीडियावरील रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे, तसेच तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील टिळक रस्त्यावर सोमवारी (30 मार्च) ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी टिळक रस्त्यावरील सर्व महाविद्यालयाजवळ आंदोलन ठेवण्यात आले होते. संबंधित पत्रकार तरुणी आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या.
याचवेळी संतोष पंडित घटनास्थळी आला आणि पत्रकारांवर संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत बोलू लागला. त्याने या महिला पत्रकाराच्या अंगावरील कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली. तसेच तिच्याकडे अपमानास्पद नजरेने पाहत अश्लील हावभाव केले. इतकेच नव्हे, तर तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे.
याशिवाय, आंदोलनात सहभागी झालेल्या इतर महिलांकडेही संतोष पंडितने (Santosh Pandit) आक्रमकपणे धाव घेत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75, 78, 352, 351(1) आणि 296 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत असून पुढील चौकशी सुरू आहे.


