बीड: राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान सुरू असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मतदान प्रक्रियेची सुरुवात झाली असून दुपारी ५.३०पर्यंत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. बीड जिल्ह्यातील रणधुमाळीत पंकजा मुंडे यांनीही जोरदार मेहनत घेतली असून, आता त्यांनी आपल्या तयारीबाबत मोठे विधान केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘ही मोहीम फक्त १२ दिवसांची नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मी नियोजनात गुंतले होते. मुंबईत अनेक बैठका घेतल्या आणि नगरपरिषदेसाठी संपूर्ण यादीही तयार केली. मुंबईतील केवळ एक कॅबिनेट बैठक सोडली तर मी कायम परळीतच मुक्कामी होते. जनता आम्हाला पाठिंबा देईल आणि आमच्या उमेदवारांना मोठा विजय मिळेल,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मतदान शांततेत होत आहे, यावर समाधान व्यक्त करत त्या म्हणाल्या, “मतदारांना मुक्तपणे मत देण्याचा अधिकार असावा. कुणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांनी व प्रशासनाने योग्य ती कारवाई करायलाच हवी.” दरम्यान, बहिण-भाऊच्या नात्यावरून विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे थोड्या कठोर भाषेत म्हणाल्या, ‘आम्हाला बहिण भाऊ म्हणणं बंद करा. आम्ही बहीण भाऊ आहोतचं. पण राजकारणात आम्ही दोघेही मोठे नेते आहोत. ते राष्ट्रवादीकडून, मी भाजपकडून… आणि राज्यभर अनेक ठिकाणी आमची राजकीय आघाडीही आहे. नातं आहे म्हणून आम्ही कमी लढतो असे नाही. दोघांनीही दोन दशकांपासून आपापल्या पक्षासाठी पूर्ण ताकद लावली आहे.’
खूनाच्या कटाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘राज्यात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देत नाही. अशा कोणत्याही विचित्र गोष्टीबद्दल माहिती माझ्यापर्यंत येत नाही. आमच्या घरातही वडिलांनी अशा गोष्टींची सर्रास चर्चा होऊ दिली नाही. माझ्या कार्यकर्त्यांनाही माहीत आहे, महिलांबद्दल गैर बोलणं मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे अशा बाबी माझ्याशी संबंधित नाहीत, त्यावर मी उत्तर का देऊ?’


