BMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत मनसे आणि शिंदे गटाने एकत्र येत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. या यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबई महापालिकेतही (BMC) मनसे महायुतीला साथ देणार का? या चर्चेने जोर धरला आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सूचक विधान करत मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुंबईत मनसेचा पाठिंबा घेणार का, या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळत शिंदे म्हणाले, “जर आणि तरच्या गोष्टी करण्यापेक्षा सध्याची परिस्थिती पहा. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर विराजमान होईल.” दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ‘राजकारणात काहीही होऊ शकतं’ असं विधान करून युतीच्या शक्यतांना वाव दिला आहे.
हेही वाचा – Eknath Shinde: राजकीय हालचालींना वेग! मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेंस कायम; एकनाथ शिंदेंनी गाठली दिल्ली
मुंबई पालिकेतील जागांचे गणित
मुंबईत बहुमतासाठी ११४ हा आकडा गाठणे आवश्यक आहे. सध्या कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही:
- भाजप: ८९ जागा
- शिवसेना (शिंदे गट): २९ जागा
- शिवसेना (ठाकरे गट): ६५ जागा
- मनसे: ६ जागा
शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यास हा आकडा ११८ वर जातो, जो बहुमतापेक्षा जास्त आहे. तरीही राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेऊन आपली बाजू अधिक भक्कम करण्याचा महायुतीचा प्रयत्न असू शकतो. कल्याण-डोंबिवलीतील ‘मैत्री’ मुंबईतही दिसणार की भाजप-शिंदे गट स्वबळावर सत्ता काबीज करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


