Pune Crime: पुण्यातून कौटुंबिक हिंसेची एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन आणि माहेरून दागिने आणण्याच्या मागणीसाठी पीडितेवर चामड्याच्या पट्ट्याने वार करून तिला नरकयातना सोसाव्या लागल्या आहेत.
छळाचा ‘क्रूर’ कळस
भाग्यश्री हितेश पारगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जून २०२४ पासून ते मे २०२५ पर्यंत त्यांच्यावर सासरच्यांकडून अमानुष अत्याचार करण्यात आले. संशयित आरोपींनी केवळ पैशांच्या हव्यासापोटी नव्हे, तर लग्नातील मानपान मिळाला नाही या क्षुल्लक कारणावरूनही पीडितेला लक्ष्य केले. पती हितेश पारगे याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. सोन्याची अंगठी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सासरच्यांकडून सतत दबाव टाकला जात होता. तसेच विरोध केल्यास माहेरच्या लोकांना संपवून टाकू, अशी धमकी दिली जात असे. छळादरम्यान आरोपींनी भाग्यश्री यांचे मंगळसूत्र आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना गंभीर दुखापत केली.
हेही वाचा – मोठी बातमी! गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून सासवड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर भाग्यश्री यांनी पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


