Gautam Adani: महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार (Ajit Pawar Dead) यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.
या धक्कादायक बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केली.
दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर गौतम अदानी यांनी एक महिन्यापूर्वी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासोबत झालेल्या भेटीची आठवण करून दिली आणि राष्ट्र व राज्याच्या उभारणीसाठी असलेल्या दादांच्या वचनबद्धतेबद्दल सांगितले.
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मला खूप दुःख झाला आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वी, आम्ही बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआयच्या उद्घाटनासाठी एकत्र उभे होतो, तो क्षण अजितजींची दूरदृष्टी, प्रगतीवरील त्यांचा विश्वास आणि भारताच्या तरुणांप्रति व भविष्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी दर्शवणारा होता,” गौतम अदानी म्हणाले.
“भविष्यासाठी सज्ज महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या कार्याला पुढे चालवून आपण त्यांच्या वारशाचा सन्मान करूया. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” असं देखील ते म्हणाले आहेत.
‘दादां’चा 35 वर्षांचा राजकीय प्रवास
त्यांच्या राजकीय प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात १९९१ मध्ये झाली. त्यांनी जून १९९१ ते सप्टेंबर १९९१ या अल्प कालावधीसाठी लोकसभा सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी राज्य राजकारणावर लक्ष केंद्रित केले आणि १९९१ पासून सलग आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. अजित पवारांनी सहा वेळेस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
अजित पवार यांनी राज्य शासनात विविध महत्त्वाची पदं भूषवली
राज्यमंत्री: १९९१ ते १९९३ या काळात त्यांनी कृषी, फलोत्पादन, ऊर्जा आणि नियोजन या खात्यांची जबाबदारी सांभाळली. कॅबिनेट मंत्री: १९९९ पासून त्यांनी जलसंपदा (पाटबंधारे), ग्रामविकास आणि पाणीपुरवठा यांसारखी महत्त्वाची खाती यशस्वीपणे हाताळली.
उपमुख्यमंत्री: त्यांनी अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१० पासून ते आजपर्यंत (५ डिसेंबर २०२४ पासून नवीन कार्यकाळ) त्यांनी या पदावर राहून राज्याच्या वित्त व नियोजन विभागाला गती दिली आहे. विरोधी पक्षनेते: जुलै २०२२ ते जून २०२३ या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही प्रभावी भूमिका बजावली.


