Buldhana News : जिल्ह्यातील धाड येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईसह चार मुलांना विषबाधा झाली होती. यामध्ये मोहंमद अली जमदार (४), मशिरा जमदार (७) आणि फातिमा जमदार (८) या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आई अफरीन जमदार (३४) आणि तीन वर्षांची अश्मिरा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारीपासूनच कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवत होता. सोमवारी प्रकृती बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिघा मुलांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असून आई अफरीन यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.


