रत्नागिरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आणि ओबीसी आरक्षण, छगन भुजबळ यांची नाराजी, कुर्डू मुरूम वाद आणि उपराष्ट्रपतींच्या शपथविधीतील अनुपस्थितीवर स्पष्टपणे भाष्य केले.
मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भुजबळ यांनी मराठा-कुणबी जीआर रद्द करण्याची मागणी करत नाराजी व्यक्त केली असताना, अजित पवार म्हणाले, “आम्ही कोणालाही नाराज करणार नाही, सरकार सर्वसमावेशक धोरण राबवेल.”
कुर्डू मुरूम वादावर बोलताना, आयपीएस अंजली कृष्णां यांच्याशी व्हायरल झालेल्या फोन संभाषणाबाबत अजित पवारांनी कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्याचे संकेत दिले. “नियमाप्रमाणे जे योग्य असेल ते करा,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संजय राऊत आणि सदाभाऊ खोत यांच्या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर देत, “मी कधीच अज्ञातवासात गेलो नाही, मी डॉक्टरकडे होतो, गरज वाटल्यास त्यांना विचारा,” असे सांगितले.
उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला जाऊ न शकल्याचे स्पष्ट केले. “आम्ही लवकरच उपराष्ट्रपतींची घरी जाऊन भेट घेऊ,” असेही त्यांनी नमूद केले. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीत निर्माण झालेल्या तणावात अजित पवारांनी संतुलित भूमिका घेत सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.


