इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी अखेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेला प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांबाबत आक्षेपार्ह आणि खालच्या थरातील उद्गार काढले होते, ज्यामुळे राज्यभरातून निषेधाच्या लाटा उसळल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना समज दिली तरीही त्यांनी टीका थांबवली नाही. या सगळ्यावर शांत असलेल्या जयंत पाटलांनी इस्लामपूर येथील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे उत्तर देत म्हटले, “वेळ येईल तेव्हा आम्ही उत्तर देऊ. मी आधीच म्हटलं होतं, ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही!’
या वक्तव्यावर उपस्थित समर्थकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. जयंत पाटील म्हणाले, फडणवीसांनी पडळकरांना समज दिली, पण त्यांनी काय बोध घेतला हे माहित नाही. माझ्याविरोधात सगळ्यांनी मिळून षड्यंत्र रचले. चौकशी करा, मला काही हरकत नाही. फक्त बोलू नका, करा प्रत्यक्ष कारवाई!
त्यांनी आणाविक म्हणाले, “एका व्यक्तीने माझ्या आई-वडिलांबद्दल चुकीची भाषा वापरली आणि त्याला समर्थन देण्यासाठी सभा घेतली गेली. भाजपमध्ये असा प्रकार मी कधी बघितला नव्हता. यामुळे भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे आणि निवडणुकीत मतदारच उत्तर देतील.”
शांत का? प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर ‘फ्रीडम’!
कार्यक्रमात जयंत पाटलांना विचारणा करण्यात आली की, प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर ते शांत का? यावर त्यांनी हसतमुखाने उत्तर दिले, “प्रदेशाध्यक्ष असताना मतदारसंघातील लोकांना भेटू शकत नव्हतो. जनसंपर्क कमी झाला होता. आता जबाबदारी नसल्याने मी पुन्हा लोकांमध्ये घुसलोय. त्यांना भेटतोय, ऐकतोय आणि काम करतोय.” या उत्तराने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली.


