मुंबई : सध्या धुरंधर 2 सिनेमाचीच चर्चा सुरु आहे. दररोज बॉक्स ऑफिसचे नवनवीन विक्रम मोडत आहे. आता ‘धुरंधर २’ या चित्रपटाला जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर राकेश बेदीच्या ‘जमील जमाली’ या पात्राची चर्चा होत आहे. त्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानी राजकारणात खळबळ उडाली आहे.
पहिल्या भागाच्या रिलीजनंतर, पाकिस्तानी नेते नबील गबोल यांनी दावा केला होता की, जमीलची भूमिका त्यांच्यापासून प्रेरित होती. हा दावा करून त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा सूर बदलला आहे. नबील गबोल यांनी नाराजी व्यक्त केली. ‘धुरंधर २’ मध्ये जमीलला ‘रॉ’ एजंट म्हणून दाखवल्यामुळे ते निर्मात्यांवर जोरदार टीका करत आहेत. तेव्हापासून नबील लपून बसले आहेत. आता एका नवीन मुलाखतीत नबील यांनी ‘धुरंधर’च्या निर्मात्यांवर निशाणा साधत चित्रपटाला कचरा म्हटले आहे. त्यांच्या मते, हा चित्रपट लयारी संस्कृतीचे चुकीचे चित्रण करतो.
गबोल म्हणाले, “मी जमील जमालीच्या भूमिकेवर अजिबात खूश नाही. आमच्या लयारीमध्ये डिस्को पाहण्याची संस्कृती नाही. लयारीमध्ये एकही बलुच पंजाबी बोलत नाही. चित्रपटात जमील जमाली पंजाबी बोलत होता. लयारीच्या संस्कृतीत माझी एक महत्त्वाची भूमिका होती. मी लयारीमध्ये खंबीर वृत्तीने राजकारण खेळलो आहे. पण चित्रपटात जमीलला एक खुशामतखोर म्हणून दाखवले आहे. त्यामुळे, ती भूमिका मला शोभत नाही.”


