मुंबई: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना’ (PMDDKY) देशभरातील 100 जिल्ह्यांत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रासाठी राज्यस्तरीय कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने या योजनेद्वारे कमी उत्पादकता, अपुरी सिंचन व्यवस्था आणि कर्जपुरवठ्याचा अभाव अशा अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील सहा वर्षांत २४,००० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प या योजनेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये धान्य साठवणूक, प्रक्रिया उद्योग, सिंचन सुधारणा आणि स्थानिक रोजगार निर्मिती या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाईल.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले, ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे. यामुळे शाश्वत शेती, जलसंधारण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. शेतीला बळकटी आणि शेतकऱ्यांना दिलासा हेच या योजनेचे खरे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या ११ विभागांतील ३६ योजना एकत्र राबविल्या जाणार आहेत. या योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्रे (KVK), कृषी बाजार समित्या, किसान समृद्धी केंद्रे आणि सहकारी पतसंस्था (PACS) या स्तरावर केली जाईल.
हेही वाचा – Solapur: बँक ऑफ महाराष्ट्रमधून शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक लंपास; कर्मचाऱ्याचा कामचूकारपणा उघड
उद्याच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ३०० हून अधिक प्रगत आणि नाविन्यपूर्ण शेतकरी सहभागी होणार आहेत. यावेळी नैसर्गिक शेती, डाळी अभियान आणि पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेचा शुभारंभ देशभरातील जिल्हा मुख्यालये आणि कृषी संस्थांमधून थेट प्रक्षेपणाद्वारे केला जाईल. मंत्री भरणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे या महत्त्वाकांक्षी आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश केल्याबद्दल आभार मानले.


