Raj And Uddhav Thackeray at MNS Dipotsav: मनसेच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आजपासून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा हा सोहळा खास असणार आहे. कारण, शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्धाटन चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्धव ठाकरेंचं नाव मनसेच्या दीपोत्सव पत्रिकेत छापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय याची देखील चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे याची औपचारीक घोषणा आज होणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
मनसे दीपोत्सवला हजेरी लावण्यासाठी, उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे आधी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर जाणार आहेत. तिथे ते राज ठाकरे आणि कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर ते राज ठाकरेंच्या कुटुंबीयांसह शिवाजी पार्कवर दाखल होतील. तिथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे दीपोत्सव 2025 चं उद्घाटन होणार आहे.
मनसेचा दीपोत्सव मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आजपासून सुरु होत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मनसेकडून दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जातं. गेली 3 वर्षं मनसेच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेकांनी हजेरी लावली. 2022ला शिंदे, फडणवीस प्रमुख पाहुणे होते. 2023 मध्ये दिग्दर्शक साजीद नाडियादवाला, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 2024 ला हिंदी चित्रपट कलाकार अजय देवगण, रोहित शेट्टी, विकी कौशल यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.


